पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे
घेरा सिंहगड (कल्याण) : किल्ले सिंहगडच्या कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी, शिवगंगा खोऱ्यातील घेरा सिंहगड पेठ भिलारवाडी (कल्याण) गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या अतिप्राचीन व शिवकालीन आई काळूबाई ग्रामदैवत व कुळदैवत मंदिरात लक्ष्मीपूजनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दिव्यांच्या लखलखाटाने आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे आई काळूबाई मंदिराचे संपूर्ण परिसरातील दृश्य अधिकच विलोभनीय आणि मनमोहक दिसत होते.
नरवीर तानाजी तरुण मंडळ, भिलारवाडी, घेरा सिंहगड (कल्याण) तसेच ग्रामस्थ आणि महिलांच्या वतीने हा दीपोत्सव व विद्युत रोषणाईचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीच्या मंदिरात दीप प्रज्वलित करून परिसर उजळविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, आजही ही परंपरा मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, महिला तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसरात उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.
यंदाच्या विद्युत रोषणाई व दीपोत्सवासाठी संदीप रेणुसे, ह.भ.प. अमोल मोरे (युवा नेते), निलेश मोरे, पप्पू मोरे, आकाश शिंदे, रोहन मोरे, कुणाल मोरे, प्रमोद मोरे, शैलेश मोरे, सौरभ मोरे आणि अक्षय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.12:16 PM










