पिंपरी-चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे चिंचवड पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.”साहेब, माझ्या सहा वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात आहे,” असे सांगत एक महिला रडत रडत पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिचे म्हणणे ऐकताच पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली सुरू केल्या.
एका चिमुकल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर ही महिला चिंचवड पोलीस ठाण्यात आली.
तिने पोलिसांना सांगितले की, तिचा दुसरा पती दारूच्या नशेत तिला नेहमी मारहाण करतो. त्या रात्री त्याने तिला धमकी दिली असून, “तुला किंवा तुझ्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला मारून टाकीन,” असे तो म्हणाल्याचा दावा तिने केला. पती मुलीला घेऊन घराबाहेर गेल्याचेही तिने सांगितले.
सहा वर्षांच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचे ऐकताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला. पोलीस पथके शहरातील विविध भागात शोध घेत होती. नातेवाईक, ओळखीचे ठिकाणे आणि परिसरातील संभाव्य ठिकाणी तपास करण्यात आला. रात्रभर सुरू असलेल्या या शोधमोहीमेमुळे पोलिसांची मोठी धावपळ झाली.
मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी त्या महिलेच्या घराची पुन्हा सखोल पाहणी केली असता वेगळेच चित्र समोर आले. ज्या मुलीच्या अपहरणाची भीती व्यक्त करण्यात आली होती, ती मुलगी तिच्या वडिलांसोबत घरातच सुरक्षित झोपलेली आढळली. पुढील चौकशीत हे स्पष्ट झाले की, पती-पत्नीमधील वादातून पतीला धडा शिकवण्यासाठी महिलेने खोटी तक्रार दिली होती.या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांचा वेळ आणि संसाधने वाया गेल्याची चर्चा सुरू आहे. कौटुंबिक वादात पोलिसांचा चुकीचा वापर केल्याबद्दल संबंधित महिलेवर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.












