हडपसर ते दिवे घाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम सुरु आहे. या कामामुळे गुरुवारी (५ फेब्रुवारी ) रोजी दिवे घाटातील वाहतूक ३ तास बंद राहणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. या वेळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.
दिवे घाट हा पुणे-सासवड-जेजुरी-पंढरपूर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा घाटमार्ग असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करतात. सध्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या विकासकामाचा भाग म्हणून दिवे घाटात रस्ता रुंदीकरण, संरक्षक भिंती उभारणी तसेच डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरक्षित आणि सुरळीतपणे करता यावे, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी काही काळ वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तीन तासांच्या कालावधीत अवजड वाहने, खासगी वाहने तसेच सार्वजनिक वाहतूक यांना घाटमार्गात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे पुणे, सासवड, जेजुरी, पुरंदर तसेच पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसू शक्यता आहे. त्यानुसार प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करावं किंवा पर्याय मार्गांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.












