लोणी काळभोर परिसरात चोरट्यांनी घर फोडून दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तसेच, बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाचे कुलूप तोडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती परिसरातील एका महिलेने (वय ३५) फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
दरम्यान, बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या बाजारपेठेतही अशीच घटना घडली. अकरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सव्वा लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य आणि १२ हजारांची रोकड चोरून नेली. याबाबत एका व्यावसायिकाने (वय ४९, रा. नाना पेठ) फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.












