मांजरी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत कायम असून गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील कुत्र्यावर हल्ला करून त्याला भक्ष्य केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांजरी-वाघोली रस्त्यालगत हॉटेल सूर्याच्या समोर शेतकरी पोपट गणपत उंद्रे यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दारातील कुत्र्यावर अचानक झडप घातली.कुत्र्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर नेऊन भक्ष्य केल्याची घटना घडली.
त्या वेळी परिसरातील इतर कुत्री जोरात भुंकत होती. कुत्री का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी आशिष उंद्रे बाहेर आले; मात्र अंधारामुळे त्यांना काही दिसले नाही. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याने कुत्र्याला ओढून नेत असल्याचे स्पष्ट झाले. ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वीही परिसरातील एका मेंढपाळाच्या मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे मांजरी-कोलवडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा नागरिकांत आहे. शेतातील बिबट्या आता थेट गावात, घरांसमोर येऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
“बिबट्याने माणसावर हल्ला केल्यास जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी पोपट उंद्रे, पोलीस पाटील भारती उंद्रे आणि माजी सरपंच रुपेश उंद्रे यांनी केली आहे.












