लष्कर भागात टोळक्याकडून पिता-पुत्राला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अल्हान साजीद खान याला अटक करण्यात आली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत अथर्व अमोल बिल्लमपल्ली (वय २४, रा. कामाठीपुरा, लष्कर), त्याचे वडील अमोल हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अथर्व याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी (१५ फेब्रुवारी) लष्कर भागात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फराळ वाटपानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अमोल आणि त्याचे वडील रिक्षातून केटरिंग व्यावसायिकाकडून घेतलेले टेबल परत देण्यासाठी निघाले होते. आोपी खान आणि साथीदार हे दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
त्यानंतर खान आणि साथीदारांनी रिक्षा अडवून बिल्लमपल्ली पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी पसार झाले. पसार झालेल्या खान याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक दांडगे तपास करत आहेत.












