सातारा प्रतिनिधी प्रशांत थोरवे :
सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून, संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी काही सदस्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या सदस्यांना घोडेबाजाराच्या शक्यतेपासून दूर ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार रणनीती आखली जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष कडूनही अध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले.
महायुती अंतर्गत निवडणूक एकत्र लढविण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक बोलावली होती; मात्र त्यातून ठोस निर्णय न झाल्याने सर्व पक्षांनी स्वतंत्र भूमिका घेत निवडणूक लढवली.
अध्यक्षपदाची निवड जवळ येत असताना पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत साताऱ्यातील राजकारण कोणत्या दिशेने वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











