वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
नागेवाडी : जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसर भगव्या पताका, फुलांची सजावट आणि शिवमय वातावरणाने नटला होता. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक शाहीर शरद यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी सुरेश जगदाळे सर, सौ. दिपाली जाधव मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. मनीषा जाधव, कल्पना बनसोडे, गावचे ग्रामस्थ व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण करून अभिवादन केले.

वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा घुमत होत्या.
यानंतर गावातून भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. नागेवाडी परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रात विद्यार्थ्यांची भाषणे झाली. आरोही, आराध्या आणि साई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि आदर्श शासनपद्धती यावर प्रभावी विचार मांडले. त्यांच्या ओजस्वी भाषणांना उपस्थितांनी दाद दिली.

तसेच शाहीर साई सणस आणि शाहीर आरव जाधव यांच्या जोशपूर्ण पोवाडा गायनाने कार्यक्रमात विशेष रंगत आली. त्यांच्या पोवाड्यांमधून शिवरायांच्या शौर्यगाथा जिवंत झाल्याचा अनुभव उपस्थितांना आला.
कार्यक्रमाच्या शेवटी गावातील तरुणांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंद साजरा केला. शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागामुळे शिवजयंती सोहळा संस्मरणीय ठरला. शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रप्रेम, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.











