शहरातील एका बहुराज्य सहकारी बँकेच्या दोन शाखांमध्ये तब्बल ९१ लाख रुपयांच्या बनावट सोनेतारण कर्ज घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४१ कर्ज प्रकरणांत तारण ठेवलेले सोने फेरतपासणीत पूर्णपणे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्याने बँक प्रशासनात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी संबंधित कर्जदार आणि तत्कालीन गोल्ड व्हॅल्युएटर अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी बँकेची तब्बल ९१ लाखांची फसणूक झाली आहे. गोल्ड व्हॅल्युअर कुलकर्णी मोबाइल बंद ठेऊन, कार्यालयाला व घराला कुलूप लावून पळून गेला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कल्याण जनता सहकारी बँकेचे उप व्यवस्थापक निलेश देशमुख (५०, रा.अमनोरा टॉवर) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती, त्यानूसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात व्हॅल्यूअरसह तब्बल ४२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक दि. २६ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत वारजे आणि बिबवेवाडी शाखांमध्ये झाली आहे.












