उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबू चांगलेच भाव खात आहे. बाजारात लिंबांची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ५ ते ७ रुपयांना मिळत आहे.
मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार एक गोणी ५०० ते १२०० रुपयांना विकली जात आहे.
बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे भाव जास्त असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. मागील महिनाभरापासून लिंबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असे मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.
बाजारात राशिणसह अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून लिंबाची आवक होत आहे. तसेच कर्नाटक राज्यातील विजयनगर भागातूनही लिंबाची आवक होत आहे. मात्र, याचे प्रमाण कमी आहे. सध्या बाजारात एक ते दीड हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. उत्पादित भागातील पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याबरोबर आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे.












