मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंधुदुर्ग व आजरा येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी शेतकऱ्यांना मालवण येथे हापूस आंबा फळबागेचे प्रशिक्षण देण्यात आले. मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.
मालवण येथील आंबा बागायतदार प्रकाश कदम यांच्या हापूस बागेस शेतकऱ्यांनी भेट दिली. आंबा उत्पादनात वर्षभर केले जाणारे नियोजन, खत, पाणी यांचे व्यवस्थापन, विविध कीटकनाशके, बुरशीनाशके कोणत्या वेळी वापरायची, ढगाळ हवामान व पावसापासून मोहोर संरक्षण कसे करायचे, आंबा लवकर बाजारपेठेत येण्यासाठी उपाययोजना यांचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. तसेच, आजरा येथे बांबू लागवडीबाबत माहिती घेण्यात आली.
पस्तीस शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी राधानगरी तालुक्याचे माजी सभापती रणजित कालेकर, बांबू लागवड तज्ञ रणजित कालेकर, राधानगरीचे माजी सभापती राजेंद्र कौलरकर पाटील,मालवण तालुका कृषी अधिकारी एस. करंदीकर,मुळशी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी प्रशिक्षणाची सोय केली होती. यावेळी आजरा तालुका व भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यांतून एकत्रितपणे बांबू लागवडीचा प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मारणे यांनी सांगितले.
यावेळी संघाचे पदाधिकारी भाऊ केदारी, राम गायकवाड, लक्ष्मण निकटे, तुकाराम मरे, दत्तात्रय उभे उपस्थित होते. शेतकऱ्यांना निरोप देण्यासाठी माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समिती सदस्य दगडूकाका करंजावणे, राहुल पवळे, काजल मोरे, राजेंद्र बांदल उपस्थित होते.












