भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्यानिमित्ताने थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्यात ठिणगी पडली आहे.
आता मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी माजी आमदार थोपटे यांच्या प्रयत्नातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात नवीन राजकीय ‘मुळशी पॅटर्न’च्या शक्यतेने थोपटे-मांडेकर संघर्ष आणखी पेटला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष मुळशीत एकत्र येणार का, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती या पदांसाठी राजकीय वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुळशी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, थोपटे आणि मांडेकर या महायुतीतील मित्रपक्षांंतील आजी-माजी आमदारांमध्ये मुळशीच्या पंचायत समितीच्या सभापदी पदावरून राजकीय डावपेच सुरू झाले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने मुळशी तालुक्यात शिरकाव केला. मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाल्या, तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीच्या निवडणुकीत सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला, तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाल्या. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.
आता पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. मांडेकर यांच्या ताब्यात मुळशी पंचायत समिती जाऊ नये, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यांच्यात बोलणी सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामध्ये माजी आमदार थोपटे हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही बोलणी यशस्वी झाल्यास भाजप आणि शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ एकत्र येऊन नवीन राजकीय ‘मुळशी पॅटर्न’ तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावरून थोपटे-मांडेकर यांच्यात संघर्ष पेटल्याचे सांगण्यात आले.
‘मुळशी’ का महत्त्वाची?
पुणे शहराजवळ असलेला मुळशी तालुक्यातील जमिनींना मोठ्या प्रमाणात भाव आले आहेत. पुणे शहरालगतचा परिसर हा झपाट्याने विकसित होत आहे. त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. या भागाचे वेगाने शहरीकरण होत असल्याने पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
बदलती राजकीय समीकरणे
मुळशी तालुका हा कायम राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. मुळशी हा विधानसभा मतदार संघ असताना काँग्रेस आणि तत्कालीन शिवसेना यांच्यात चुरस असायची. मात्र, २००९ मध्ये या मतदार संघांची पुनर्रचना झाल्यावर मुळशी मतदार संघ राहिला नाही. मुळशी तालुक्याचा समावेश भोर विधानसभा मतदार संघात करण्यात आला. तेव्हापासून काँग्रेसच्या ताब्यात हा मतदार संघ होता. माजी आमदार संग्राम थोपटे यांना हा परिसर साथ देत आला. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविणारे शंकर मांडेकर हे निवडून आले. त्यानंतर थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.












