उन्हाळ्याची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची मागणीही वाढू लागली आहे.सध्या शहरात पाण्याचा प्रश्न जटील होवू लागला आहे. पाण्याची मागणी वाढल्याने अनेक सोसायट्यांमध्ये देखील टॅंकरची संख्या वाढत आहे. शहरातील नागरिकांना विस्कळीत, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
अनेक नागरिक पिण्याच्या पाण्याने अंगण, रस्ते, पार्किंगचा परिसर, जिने आणि वाहने धुतात. झाडे, बागांना पिण्याचे पाणी घालतात. घर, बंगले व इमारतींवरून पाण्याच्या टाक्या भरून वाहत असतात. काहीजण रस्त्यावर पाणी सोडून देतात. काही वॉशिंग सेंटर चालक पिण्याचे पाणी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या एक महिन्यात या संदर्भात तब्बल ४७० तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १८२ तक्रारींचा निपटारा करुन २८८ तक्रारीवर अद्याप काम सुरु आहे.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ४७० तक्रारी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर आल्या आहेत. यामधील १८२ तक्रारींचा निपटारा केला असून, २८८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. शहराला मागील सहा वर्षापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दोन दिवसांतून एकदाच पाणी मिळते. तरीही अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची सातत्याने ओरड सुरू आहे.
२० मार्च ते २० फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर अपुरा, कमी दाबाने, विस्कळीत, दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या ४७० तक्रारी आल्या आहेत. यामधील १८२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, २८८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. तक्रारींमध्ये सर्वाधिक ‘ब’ प्रभागातून ९०, तर सर्वांत कमी ‘अ’ प्रभागातून ३४ तक्रारी आल्या आहेत.
सोसायट्यांना टॅंकरचा भुर्दंड
महापालिकेने शहरातील नागरिकांना समन्यायी पध्दतीने पाणी वाटप करण्यात येत आहे. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील सुमारे ३० लाख नागरिक पाण्याची सोय करावी लागत आहे. मागील एक महिन्यापासून अनियमित, अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. उन्हाळा सुरू होताच शहरातील कूपनलिकांचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना टॅंकरचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्यामुळे पाण्याच्या तक्रारींत काही प्रमाणात वाढ झाली आहे. अपुरा, कमी दाबाने, दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनीही पिण्याचे पाण्याचा अपव्यय टाळावा, वाहन, अंगण धुण्यासाठी पाणी वापरू नये. पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पाणी हे काटकसरीने वापरण्यात यावे.












