वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
वाई : सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील चिखली केंद्र समूहाचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात श्री साई चवणेश्वर मंगल कार्यालय, चिखली येथे पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, त्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने भरून गेला.या मेळाव्यात केंद्रातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लहानग्या विद्यार्थ्यांच्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. काही कार्यक्रमांतून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी यांसारखे संदेशही देण्यात आले.विविध प्रकारचे मनोरंजक खेळ खेळून विद्यार्थ्यांनी आनंद मिळवला

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मा. श्री. विक्रांत (भैय्यासाहेब) डोंगरे, पंचायत समिती सदस्य मा. श्री. स्वप्नील (भाई) गायकवाड तसेच गटशिक्षणाधिकारी मा. श्री. हर्षवर्धन मोरे साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते मोठे यश मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. शालेय जीवनात अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
या मेळाव्यास शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शकील मोमीन साहेब,श्री. दिलीप बाबर साहेब तसेच वयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी भोसले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांनी आपले ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख सौ. निर्मला भांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

तसेच विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात, उत्साहपूर्ण वातावरणात आणि आनंदी क्षणांनी हा बाल आनंद मेळावा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.











