पुणे, ता. २८ – कात्रज परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा वडिलांच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजता वंडर सिटीसमोरील मुख्य रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना घडली.
मृत मुलाचे नाव अंश भाऊरंग कांबळे (वय ३, रा. अंजनी नगर, कात्रज) असे असून, ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५०, रा. लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशचे वडील भाऊरंग कांबळे हे मुलाला दुचाकीवर (MH12 TE 2937) घेऊन जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (MH19 CY 9572) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अंश रस्त्यावर फेकला जाऊन थेट ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच Bharati Vidyapeeth Police Station आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातांचे वाढते प्रमाण; नागरिकांत संताप
कात्रज परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या मार्गावर चोवीस तास अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, वेगावर नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
याशिवाय, रस्त्यावरील निसरडेपणा आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी Katraj Dairy समोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच पुन्हा एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या परिसरात तातडीने वेगमर्यादा नियंत्रण, सिग्नल व्यवस्था, स्पीड ब्रेकर आणि अवजड वाहनांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.











