पुणे, दि. २ मार्च २०२६ – गंज पेठ (633) परिसरात सुरू असलेल्या SRA (स्लम पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाच्या कामकाजाबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. हा प्रकल्प स्थानिक पुढारी, बिल्डर तसेच काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर पद्धतीने राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मातंग समाज तसेच इतर दलित समाजातील नागरिकांवर अन्याय व दबाव टाकला जात आहे. पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून रहिवाशांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या कामकाजात नियमांचे उल्लंघन होत असून बिल्डरच्या फायद्यासाठी काही अधिकारी संगनमताने कार्य करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच संबंधित उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश खडके व इतर संबंधित अधिकारी तसेच विकसक यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली.
यावेळी चांगदेव नेटके, मनोज आप्पा क्षिरसागर, तेजस माने, प्रवीण क्षिरसागर, सनी बाबा अवघडे, प्रज्वल आढागळे, तेजस साबळे, विनायक साबळे आदी उपस्थित होते.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.











