फी परताव्याच्या मागणीसाठी आंदोलन; प्रशासनाचा संवाद टाळण्याचा आरोप
पुणे, दि. २ मार्च २०२६ : अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त फीच्या परताव्याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे छात्रभारती महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याऐवजी उपसंचालकांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून घेतले आणि कोणतेही स्पष्ट उत्तर न देता तेथून निघून गेल्याचा आरोप छात्रभारतीने केला आहे. या घटनेचा संघटनेने जाहीर निषेध केला आहे.
महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक महाविद्यालयांना २० टक्के, ४० टक्के तसेच ६० टक्के अनुदान वितरित केले आहे. संबंधित शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात फी परत मिळणे अपेक्षित आहे. या मागणीसाठी छात्रभारतीने शिक्षण संचालक व उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर यापूर्वीही अनेक वेळा आंदोलन केले होते. त्या वेळी शिक्षण संचालकांनी सर्व महाविद्यालयांना फी परत करण्याबाबत पत्र काढण्याचे आश्वासन दिले होते, असे संघटनेने सांगितले.
तथापि, वारंवार निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २ मार्च रोजी छात्रभारतीचे पदाधिकारी अधिकृत माहिती व लेखी स्पष्टीकरण मिळावे या मागणीसाठी आंदोलनास बसले. परंतु संवाद टाळत कार्यालय बंद ठेवण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
छात्रभारतीच्या मते, हा प्रकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केलेली गंभीर उपेक्षा आहे. “जर प्रशासनाकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर त्यांनी समोर येऊन स्पष्ट आकडेवारी आणि लेखी आदेश जाहीर करावेत. कार्यालय बंद करून पळ काढणे हे उत्तर होऊ शकत नाही,” अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
या आंदोलनावेळी छात्रभारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, राज्य संघटक विशाल शिंदे, राज्य उपाध्यक्ष तुकाराम डोईफोडे, तसेच पुणे जिल्हाध्यक्षा जमुना सोळंके, सौरव शिंपी, राहुल जऱ्हाड, वैष्णवी कोळी,उदय पवार, संचित भांगरे, ऊर्जा गायकवाड, तेजस्विनी माघाडे, अनुजा तिकांडे, श्रावणी शहाणे, संघर्ष पवार, पल्लवी पिंपळकर, बुद्धभूषण बगाडे, साहिल गुजरवार,प्रकाश पाटील, ओंकार वाघमारे .इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देत “लढेंगे, जितेंगे” असा निर्धार छात्रभारतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
– जमुना सोळंके
पुणे जिल्हाध्यक्षा, छात्रभारती महाराष्ट्र











