मुंबईतील बोरीवली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक चोरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बोरीवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमधील “माय गोल्ड पॉइंट” या ज्वेलरी दुकानातून तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 7 कोटी 88 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
ही घटना 13 आणि 14 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यावर मालकाच्या लक्षात आलं की शोकेसमधील सर्व दागिने गायब आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दुकानाचं कुलूप तुटलेलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला ही चोरी नेमकी कशी झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
तपासात समोर आलं की चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडण्याऐवजी डुप्लीकेट चावी तयार करून दुकान उघडलं. म्हणजेच ही चोरी आतल्या माहितीच्या आधारे आणि पूर्ण नियोजन करून करण्यात आली होती.
घटनेनंतर दुकानातील दोन कर्मचारी अचानक गायब झाल्यामुळे पोलिसांचा संशय त्यांच्यावर गेला. दुकान बंद करण्याची आणि चावी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गणपत चदाणा (26) आणि किशनलाल उर्फ भैरू बगलाल रेबारी (21) यांना अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून आतापर्यंत 3 किलो 100 ग्रॅम सोने जप्त करण्यात आलं आहे.
या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचं उघड झालं असून त्याला ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे. आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही चोरी इतक्या शांतपणे आणि शिताफीने करण्यात आली की आजूबाजूच्या कुणालाही त्याची चाहूल लागली नाही. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पोलिस पुढील तपास करत असून उर्वरित सोनं जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.











