उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नवऱ्याच्या मारहाणीपासून स्वतःला वाचवण्यासाठी बहिणीने भावाला केलेला एक फोन तिच्या कुटुंबासाठी कायमचा काळा दिवस ठरला. बहिणीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या 23 वर्षीय विशालची त्याच्याच मेहुण्याने कात्रीने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वादातून उफाळला संताप
माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी विशालची बहीण टीना हिचा तिच्या पती राहुल ऊर्फ अर्जुन सिंह याच्यासोबत घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने घाबरलेल्या टीनाने आपल्या भावाला फोन करून “लवकर ये आणि मला वाचव” अशी आर्त विनंती केली. बहिणीचा घाबरलेला आवाज ऐकताच विशाल तातडीने तिच्या घरी पोहोचला.
घरी आल्यानंतर विशालने बहिणीची विचारपूस केली आणि याचदरम्यान त्याचा मेहुणा राहुल याच्याशी त्याची बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला शब्दांमध्ये सुरू झालेला वाद हळूहळू तीव्र होत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
कात्रीने सपासप वार
वाद चिघळल्याने संतापाच्या भरात राहुलने घरातील कात्री उचलली आणि विशालवर सपासप वार केले. छाती, पोट आणि कमरेवर गंभीर जखमा झाल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी आणि काही नातेवाईकांनी प्रकरण पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विशालचा मृतदेह टेम्पोमध्ये ठेवून परस्पर अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाल्याचे सांगितले जाते. बेहटा हाजीपूर पुलाजवळ पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून वाहन अडवले. पोलिसांना पाहताच आरोपी तेथून पसार झाले.
विशाल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गुपचूप अंत्यसंस्काराचा प्रयत्न
डॉक्टरांनी पोलिसांची माहिती नसताना मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार दाखल झालेली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. फरार आरोपी राहुल ऊर्फ अर्जुन सिंह याचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एका बहिणीच्या संरक्षणासाठी धावलेल्या भावाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.











