जमिनीच्या वादातून चुलत भावानेच दुचाकीला मोटारीने धडक देऊन भावाचा खून केल्याची घटना भवरापूर (ता. हवेली) येथे घडली. सोमवारी (ता. २) सायंकाळी साठे वस्तीजवळ झालेल्या या घटनेत महेश लक्ष्मण साठे (वय ३४) यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.दरम्यान, हा अपघात नसून जीवे मारण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याप्रकरणी मृत महेश यांचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय ५८) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) आणि गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. आष्टापूर) यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेश साठे आणि अक्षय साठे यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून महेश यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
तक्रार देऊन दुचाकीवरून (एमएच १२ बीजे ९५५१) घरी परतत असताना, साठे वस्तीजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच १२ क्यूवाय ७८८८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महेश यांचा जागीच मृत्यू झाला.












