राज्यसभेच्या जागांसाठी आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक उरले आहेत, मात्र शिवसेनेकडून (शिंदे) अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
शिवसेनेमध्ये (शिंदे) इच्छूकांची गर्दी आहे. प्रवक्त्या शायना एनसी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, गजानन किर्तीकर देखील या जागेसाठी इच्छूक आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून काँग्रेस नेते रोहित टिळक यांचा देखली अर्ज दाखल केला जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून (शिंदे) दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा मिळाली आहे. या एका जागेसाठी त्यांच्याकडे इच्छूकांची रांग लागली आहे. यामध्ये उमेदवारीचे प्रबळ दावेदार शिवसेनेचे दक्षिण मध्यचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे, तर नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांना पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवणार असे आश्वस्त केले आहे. दोन माजी खासदारांच्या वादात ज्योती वाघमारे यांना लॉटरी लागली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ज्योती वाघमारे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधान भवन परिसरात दाखल झाल्या आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांसह ज्योती वाघमारे पोहचल्या, येथे त्यांनी सर्व महापुरुषांचा जयजयकार केला. ज्योती वाघमारे यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला राज्यसभेवर पाठवले आहे.
कोण आहेत ज्योती वाघमारे?
ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे ओळखल्या जातात. दलित समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे या फर्ड्या वक्त्या, शैलिदार निवेदिका म्हणून सोलापूरमध्य परिचित आहेत. त्यांची मातृभाषा तेलगू असून इंग्रजीवरही त्यांचे प्रभूत्व आहे. त्यांनी इंग्रजी भाषेतून पी.एचडी केली आहे.
मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीत त्या सक्रीय आहेत.ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील चळवळीची आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते आणि सोलापूर महापालिकेत नगरसेवक देखील होते. सुरुवातीला त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले नंतर ते चळवळीत सक्रीय झाले.
ज्योती वाघमारे या सुरुवातीला काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या, 2014 मध्ये सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. काही काळ त्या राजकारणापासून दूर होत्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नेमण्यात आले.
रोहित टिळक कोण आहेत?
रोहित टिळक हे पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यसभेची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला रोहित टिळक यांचे नाव चर्चेत आले आहे. रोहित टिळक यांनी शिवसेनेकडून (शिंदे) उमेदवारी अर्ज दाखल केला तर शरद पवार यांच्यासमोर आव्हान उभे राहणार आहे.
भाजप नेहमीच असा खेळ करते – संजय राऊत
शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांच्यासह रोहित टिळक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल झाले तर महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून (शिंदे) दोन उमेदवार देण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. भाजप नेहमीच अशा प्रकारे खेळ करत असते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.












