पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा ते चिंबळी फाटा या सुमारे दीड किलोमीटर अंतरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे उद्योजक, व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, डॉक्टर असे सारेच वैतागले आहेत.
याकडे राजकीय नेते, पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी या सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांत जास्त वाहतूक कोंडी कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोई फाटा, चिंबळी फाटा या ठिकाणी होते. एक ते दीड किलोमीटर जाण्यासाठी साधारणपणे एक ते दोन तास जातात.
दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होते. यात रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, पोलिसांची वाहनेही अडकतात. या कोंडीचे गांभीर्य कोणालाच नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. या मार्गाने राजकीय नेते, मंत्री, अधिकारी ये-जा करतात. तरीही कोंडी सुटत नाही. वाहतूक पोलिस असतात, तेव्हा वाहने कशीबशी सुरळीत जातात. पण, ती तेवढ्यापुरतीच. पण, त्यानंतर पुन्हा कोंडी होते आणि नागरिकांची घुसमट होते.
प्रमुख कारणे
पुणे-नाशिक महामार्ग अरुंद आहे, सेवा रस्ता नाहीमहामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे
औद्योगिक परिसर व खासगी मालकांची गोदामे असल्याने अवजड वाहनांची संख्या अधिक
कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोईफाटा, चिंबळी फाटा परिसरांतील कंपन्यांकडे वाहने वळताना कोंडी होते
महामार्गाच्या साइडपट्ट्या पूर्णपणे खचल्या, उखडलेल्या आहेत
महामार्गाच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा
विरुद्ध दिशेने येणारे व पुढे जाण्याच्या प्रयत्नात ‘लेन कटिंग’ करणाऱ्या बेशिस्तांमुळे कोंडीत भरस्वतंत्र पदपथ नसल्याने पादचाऱ्यांचा ये-जा रस्त्यांवरून
महामार्ग रुंदीकरणाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष
चुकीच्या पद्धतीने दुभाजक फोडून मार्ग केल्याने कोंडी
पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गाचे काम प्रलंबित आहे. मार्ग अरुंद आहे. संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत.












