वाढत्या तापमानामुळे चाकण व परिसरात कलिंगडाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत दर आठवड्याला सुमारे १०० टन कलिंगडाची आवक होत आहे. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात कलिंगडाचे दर प्रति किलो २० ते ३० रुपयांवर पोहोचले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक थंड फळांकडे वळले आहेत. चाकणमधील मुख्य बाजार आवारात पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, सांगली यांसह कर्नाटक राज्यातून ट्रकद्वारे कलिंगडाची आवक होत आहे.
शहराच्या प्रमुख मार्गांवर आणि चौकांमध्ये कलिंगडाचे ढीग लागले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.सध्या बाजारात फळांच्या आकारानुसार आणि गुणवत्तेनुसार बाजारभाव निश्चित होत आहेत.
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नागरिक कलिंगडाला पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यास मागणी आणि आवक दोन्हीमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.












