वाई | प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. ज्ञानदेव शेठ सणस हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या संभाव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे. याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना श्री. सणस म्हणाले की, “माझा निर्णय कोणत्याही पद, सत्ता किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नसून भागाच्या विकासासाठी आहे. अनेक वर्षांपासून विकासाच्या संधी असूनही अपेक्षित काम झालेले नाही. आता प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे.”
भाजपची विचारधारा ही विकास, राष्ट्रहित आणि शिस्तबद्ध प्रशासनावर आधारित असल्याचे सांगत सबका साथ, सबका विकास या तत्वानुसार काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व युवकांच्या भविष्यासाठी आपण सक्रिय भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाई तालुक्यातील पश्चिम भागात सणस कुटुंबाचे सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. पश्चिम भागातील सामाजिक जीवनात ज्ञानदेव शेठ सणस यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने समाजकार्यात सक्रिय असून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असल्याची त्यांची ओळख आहे.
पश्चिम भागातील विविध गावांमध्ये त्यांना मानाचा आणि विश्वासाचा व्यक्ती म्हणून पाहिले जाते. सामाजिक सलोखा, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे सणस कुटुंबाला पश्चिम भागात मोठा जनाधार लाभलेला आहे.
या पार्श्वभूमीवर श्री. ज्ञानदेव शेठ सणस यांचा भाजपमध्ये होणारा प्रवेश हा पक्षासाठी पश्चिम भागात संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीनेही ही घडामोड निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.











