पथारी, हातगाडी व स्टॉलधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी पथ विक्रेता (स्ट्रीट व्हेंडर्स) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी आज जाणीव संघटना महाराष्ट्र राज्य,नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन , दिलासा जन विकास संस्था पुणे तसेच विविध फेरीवाला संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आला.
शहराच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने उपजीविका करण्याचा अधिकार मिळावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
विकासाच्या नावाखाली श्रमिकांना बेदखल करण्याच्या धोरणाला तीव्र विरोध व्यक्त करत फेरीवाल्यांचे हक्क, उपजीविका आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. मोठ्या संख्येने फेरीवाले, हातगाडी व स्टॉलधारक या मोर्चात सहभागी होत आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवली.












