पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे
पाचगणी : शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भविष्याची दिशा घडवण्याची प्रक्रिया — या विचारातून पाचगणीतील नामांकित बिलिमोरिया हायस्कूल तर्फे ‘आरंभ – फेस्टिव्हल ऑफ लर्निंग’ या भव्य महोत्सवाचे आयोजन २३, २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. कृतियुक्त शिक्षण, संकल्पना स्पष्टता आणि अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षणपद्धतीचा आदर्श प्रस्तुत करणारी ही शाळा विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘आरंभ’चे आयोजन करते.
शुक्रवार, २३ जानेवारी रोजी बिलिमोरिया हायस्कूलच्या प्रशस्त मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, तीन दिवस चालणाऱ्या या शैक्षणिक उत्सवात नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट प्रदर्शन, विज्ञान व संकल्पना स्पष्टीकरण सत्रे, रोमांचक क्रीडा स्पर्धा तसेच भारतातील नामांकित युनिव्हर्सिटीजचे करिअर मार्गदर्शन स्टॉल्स आयोजित करण्यात आले आहेत.
शाळेच्या संस्थापिका व ओनर सौ. अदिती गोराडिया यांच्या दूरदृष्टीतून आणि डायरेक्टर पियुष सर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलिमोरिया हायस्कूलने अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर प्राचार्य विशाल कानडे सर यांच्या कुशल नेतृत्वामुळे शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्तबद्ध वातावरणाला नवे परिमाण लाभले आहे.
भारताच्या पहिल्या दहा उत्कृष्ट निवासी शाळांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी बिलिमोरिया हायस्कूल ही केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘आरंभ’ हा कार्यक्रम पाचगणीच्या शैक्षणिक विश्वात नव्या विचारांचा, नव्या संधींचा आणि नव्या यशाचा आरंभ ठरणार आहे.
या तीन दिवसांच्या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांचे पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून महोत्सवाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.











