पुणे मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. देशातील गतिमान मेट्रो प्रकल्पाच्या यादीत पुणे मेट्रोचादेखील समावेश आहे. पुण्यात सध्या ३३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे पण शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आगामी काळात पुणे मेट्रोचा विस्तार हा २०० किलोमीटरवर केला जाणार आहे.यापैकी ८० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो भवनचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, सुरेश पठारे, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील वाहतूक सोडविण्यासाठी विविध पातळीवर काम केले जात आहे. पुण्यातील वाहतुकीला गती देण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. यात रस्ते, उड्डाणपूल व बोगद्याचा समावेश आहे. पुणे हे वाहतूक कोंडीमुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविक केले.
देशात सध्या ‘ग्लोबल कॅपिसिटी सेंटर’ची लाट आहे. महाराष्ट्र त्या दृष्टीने काम करीत असून, त्या दिशेने पाऊल टाकत आहे. पुण्याचा विचार करता पुणे हे ‘जीसीसी’चा हब बनत आहे. यामुळे पुण्यात उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण होतील. पुण्यातील तरुणांना चांगला पगार मिळेल. परिणामी अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आधुनिक पुण्याचे प्रतीक
सायकलींचे शहर म्हणून पुण्याची असलेली ओळख आता मेट्रो शहर म्हणून झाली आहे. पुण्याचा विस्तार झपाट्याने होत असताना पुणे व पिंपरी चिंचवड ही शहरे राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन बनली आहेत. मेट्रो भवनची इमारत ही पुण्याच्या वैभवात भर घालणारी आहे. ही जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजे. तंत्रज्ञान, कार्यक्षमता व पर्यावरण याचे संगम या इमारतीच्या ठायी पहायला मिळते.’मेट्रो भवन’ हे आधुनिक पुण्याचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले.












