जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हातवे-तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नऊ वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाजी नामदेव शिळीमकर (वय 69) आणि तन्वी नितीन शिळीमकर (वय 9, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणे, मूळ रा. तांभाड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिळीमकर हे आपल्या नात तन्वीसह दुचाकीवरून आंबेगावहून मूळ गाव तांभाडकडे निघाले होते. हातवे-तांभाड मार्गावरील देऊळवाडीजवळ ते पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच 14/ एचयू 3777) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
डंपर चालकाला अटक
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी आजोबा आणि नातीला नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
दरम्यान, शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून एकाच वेळी आजोबा आणि नातीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख ओढावले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.












