वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई, दि. १६ : अनपटवाडी (ता. वाई) येथे १४ मार्च रोजी सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. जयहिंद फाउंडेशन आणि ग्रामपंचायत अनपटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात संपूर्ण गाव ‘विधवा प्रथा मुक्त’ झाल्याची घोषणा करण्यात आली. परंपरेच्या नावाखाली रूढ झालेल्या अनिष्ट प्रथांना बाजूला सारत गावातील विधवा भगिनी आणि वीरपत्नींना सन्मानाने हळदी-कुंकू लावून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यावेळी शहीद स्मारकाचे लोकार्पण वीरपत्नी सौ. प्रियांकाताई नवनाथ दाभाडे, सौ. प्रियंकाताई सोमनाथ मांढरे आणि सैनिक पत्नी सौ. शारदाताई नंदकुमार अनपट यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ग्रामदैवत श्री वाकडेश्वर महाराज मंदिरात माजी सैनिक चंद्रकांत इंगळे यांच्या हस्ते आरती करून मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ९४ वर्षांच्या सुलोचना तुकाराम मांढरे या आजींनी इतर २० महिलांसह उत्साहाने हळदी-कुंकवाचा मान स्वीकारला. वीरपत्नी प्रियांकाताई दाभाडे आणि प्रियांकाताई मांढरे यांचाही सौभाग्याचे लेण देऊन सन्मान करण्यात आला. हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमास दिशा अकॅडमीच्या संचालिका रुपाली कदम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शुभदा नागपूरकर, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या तनुजा इनामदार, बावधनच्या सरपंच वंदना कांबळे, डॉ. तृप्ती चक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभदा नागपूरकर यांनी जयहिंद फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत या चळवळीत सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले. डॉ. तृप्ती चक्के यांनी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या रुग्णालयात ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सेवा देण्याची घोषणा केली. या वेळी सौ. हेमलताई फडतरे यांनी उपस्थितांना विधवा प्रथा मुक्तीची शपथ दिली. तसेच जयहिंद फाउंडेशनच्या वतीने बावधन ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना कांबळे यांना निवेदन देऊन बावधन गावही विधवा प्रथा मुक्त करण्याची विनंती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. मनीषा अरबुणे यांनी केले, तर सूत्रसंचालन हनुमंत मांढरे यांनी केले.

खटाव, सातारा, बारामती आणि वाई येथील जयहिंद फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच गावातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्राथमिक शाळेत सर्व मान्यवर व सत्कारमूर्तींच्या सहभोजनाने झाली.












