चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या लगत महिलेचा विवस्त्र व शरीराचे लचके तोडलेला मृतदेह सोमवारी (दि. १६ मार्च) मिळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी या भागात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली .
एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. आपण पाहतोय, ते खरे आहे, यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. अर्धा डझन कुत्री महिलेच्या अंगाचे लचके तोडत होते. महिलेच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला होता. हिंस्र भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शोभा विजय वाघमारे ( वय ३२, सध्या रा. चाकण , मूळ रा. देगलूर, जि. नांदेड ) असे या घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संबंधित महिला पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या खालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे ६ कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला.
महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला , मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे महिला अपयशी ठरली. मोकाट कुत्र्यांचा झुंड पाहून महिलेने दगड उचलले मात्र सहा कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला चढवल्याने महिलेला प्रतिकार करणे अशक्य झाले. कुत्र्यांच्या टोळक्याने महिलेच्या अंगावरील सर्व वस्त्र फाडून टाकली व अंगाचे लचके तोडले. हात-पाय अन् तोंड-मान सगळ्या अंगावर चावे घेतले. सुमारे १५ मिनिट हा थरार सुरु होता. मोठा रक्तस्राव व वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने जागेवरच प्राण सोडले.












