पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी अधिकृतपणे स्वीकारली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याला शहरातील विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. . पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
प्रशासकीय बदलाचे स्वागत
महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहराच्या आगामी विकासकामांबाबत आणि नियोजित प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पिंपरी चिंचवड शहराचे नवे महापौर रवि लांडगे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्यासह नगरसेवक संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन व इतर नगरसदस्या उपस्थित होते.
काय असतील आयुक्तांपुढील आव्हाने?
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या विविध विभागांची माहिती घेतली. आगामी काळात शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटीच्या कामांना गती देणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य उद्दिष्ट असणार आहे. यावेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रभावी काम करण्याला माझे प्राधान्य राहील.”अशी ग्वाही नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
विकासकामांबाबत सविस्तर चर्चा
पदभार हस्तांतरणाच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नूतन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरात सुरू असलेल्या विविध मोठ्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांची गती कायम राखणे, सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक दर्जेदार आणि सुलभ करणे, महापालिकेचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यावर भर देणे, इ. विषयांवक सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोण आहेत डॉ. विजय सूर्यवंशी?
डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रशासकीय वर्तुळात त्यांच्या शिस्तबद्ध आणि विकासकामांच्या धडाक्यासाठी ओळखले जातात.
त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे –शिक्षण: ते व्यवसायाने डॉक्टर (MBBS) आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला.
IAS बॅच: ते २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.अनुभव: पिंपरी चिंचवड महापालिकेपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC): आयुक्त म्हणून त्यांनी तिथे उल्लेखनीय काम केले, विशेषतः कोरोना काळात त्यांनी राबविलेली ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना राज्यभर गाजली होती.
रायगड जिल्हाधिकारी: रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले.
MMRDA: त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.












