पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. सन २०२६ मधील जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि.१६ मार्च २०२६) पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, नगरसेविका अनिता इंगळे, नगरसेविका अर्चना जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षनेत्या हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका सपना छाजेड तसेच महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्था व नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जयंती उत्सव मंडळांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून महापालिका प्रशासनाने विविध विभागांना आवश्यक त्या सुविधा व व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात नागरिकांसाठी सावली मंडप उभारणे, उद्यानातील फरशीवर मॅटिंग टाकणे, पिण्याच्या पाण्यासाठी सहा टँकर उपलब्ध करून देणे तसेच आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांसाठी पेपर ग्लासची व्यवस्था करण्याबरोबरच उद्यान परिसरात स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र पथक तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.तसेच जीपीओकडून येणाऱ्या रस्त्यालगत सहा पोर्टेबल मोबाईल टॉयलेट (प्रत्येकी ८ आसनांची) उभारण्याचे, त्यांची वेळोवेळी स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आले.
उद्यान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था, माईक-साऊंड सिस्टम, जनरेटर बॅकअप तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन उद्यान परिसरात फिरता दवाखाना, दोन रुग्णवाहिका, डॉक्टर, फार्मासिस्ट व सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन अग्निशामक दलाची एक गाडी सर्व साधनांसह उद्यान परिसरात ठेवण्यात येणार असून जवळच्या अग्निशामक केंद्रात एक गाडी स्टँडबाय ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच अँम्ब्युलन्स व व्हीआयपी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग मोकळा ठेवण्याचे, नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे तसेच अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश देण्यात आले. उद्यानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, राडारोडा हटविणे, फुटपाथ स्वच्छ ठेवणे व आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याशिवाय उद्यान व मेघडंबरी परिसराची विशेष स्वच्छता राखणे, पुतळ्यावर वाहण्यात येणारे पुष्पहार वेळोवेळी काढून परिसर स्वच्छ ठेवणे, उद्यानातील झाडांची योग्य पद्धतीने छाटणी करणे तसेच आवश्यक ती रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले. १० एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत उद्यान व आजूबाजूचा परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
महापालिकेच्या सर्व परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक महापालिका आयुक्त व वॉर्ड अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन सर्व कामांची पाहणी करून व्यवस्था सुरळीत पार पडेल याची खातरजमा करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले.
तसेच शहरातील विविध भागांत जिथे जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणीही नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पुणे महानगरपालिकेच्या या नियोजनामुळे यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरात शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहात साजरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












