तुळशीबागेत दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत एका व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांचे तुळशीबागेत रुपश्री इमिटेशन ज्वेलरी हे दुकान आहे. रविवारी तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी असते. दिवसभरात जमा झालेली रोकड त्यांनी गल्ल्यात ठेवली होती.
चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ७० हजारांची रोकड चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केेलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, तसेच पिशवीतून रोकड लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. गर्दीत महिलांकडील दागिने, रोकड लांबविण्याच्या चार ते पाच घटना गेल्या पाच ते सहा महिन्यात घडल्या आहेत.












