वाघोली परिसरात अंतर्गत रस्ता बंद करण्याच्या हेतूने काही प्लॉटधारकांनी रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीरपणे मंदिर उभारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित बांधकामावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १३६० मधील प्लॉटिंगमध्ये १२ आणि १८ फुटांचे अंतर्गत रस्ते आहेत. तसेच प्लॉट क्रमांक १९ च्या लगत कवडे वस्तीवरून पुणे-नगर रोडला जाण्यासाठी सुमारे २० फुटी अधिकृत रस्ता उपलब्ध आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून येथे नियमितपणे वाहतूक सुरू असते.
गट क्रमांक १३६० मधील प्लॉट क्रमांक १८ समोरून जाणारा १८ फुटी काँक्रीट रस्ता पूर्वीपासून या मुख्य रस्त्याशी जोडलेला आहे. मात्र काही प्लॉटधारकांनी हा रस्ता बंद करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी लोखंडी गेट लावून वाहनांची ये-जा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील रहदारीवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यासाठी शोधण्यात आलेला उपाय मात्र आक्षेपार्ह ठरला आहे.लहान दगडावर गुलाल अन् फुलांचे हार घालून पूजाया प्रकरणात ८ नोव्हेंबर २०२५ रोजी काही प्लॉटधारकांनी रस्त्याच्या मध्यभागी लहान दगड ठेवून त्यावर गुलाल, फुलांचे हार घालून पूजा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी खडी, विटा, सिमेंट आदी बांधकाम साहित्य आणून ठेवण्यात आले. तसेच काही बांधकाम मजुरांनाही बोलावून काम सुरू केले.
रस्ता बंद करण्यासाठी प्लॉटधारकांनी धार्मिक आधार घेतल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे.ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक अर्जदारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या बांधकामाला विरोध केला. मात्र त्यावेळी उपस्थित काही प्लॉटधारकांनी उलटसुलट उत्तरे देत बांधकाम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने अर्जदारांच्या मुलाने महाराष्ट्र पोलीस सेवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच काही वेळातच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आणि उपस्थित प्लॉटधारकांना पुढील कोणतेही काम न करण्याचा इशारा दिला.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्या दिवशीचे काम थांबवण्यात आले.पीएमआरडीएकडून नोटीस बजावूनही बांधकाम सुरुचयाप्रकरणी पीएमआरडीएने डिसेंबरमध्ये प्लॉटधारकांना नोटीस बजावली आहे. स्थानिकांच्या मते, हे बांधकाम नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीशीनुसार, अशा प्रकारचे विनापरवाना बांधकाम करणे हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार बेकायदेशीर आहे.
या कायद्याच्या कलम ५२ नुसार अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई होऊ शकते. तसेच कलम ५३ (१) नुसार अशा बांधकामाचे तत्काळ निष्कासन करण्याची कारवाईदेखील प्रशासनाकडून करण्यात येऊ शकते, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.याशिवाय संबंधितांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बांधकाम किंवा विकासकाम तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच सुनावणीच्या दिवशी लेखी हमीपत्र देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. नोटीस मिळूनही जर संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही किंवा बांधकाम सुरू ठेवण्यात आले, तर कायद्यानुसार इमारत व बांधकाम साहित्य जप्त करून संबंधित मालक, विकसक किंवा भोगवटादारांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पीएमआरडीएकडून नोटीस बजावूनही येथे बांधकाम सुरुच असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.












