वाल्हे (ता. पुरंदर) येथील शंभू महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी पारंपरिक पद्धतीने अढी वाचन करून वार्षिक पीकपाण्याची भाकणूक करण्यात आली.यंदा परिसरात समाधानकारक पाऊस होऊन धनधान्य चांगले होईल, अशी भाकणूक या वेळी वर्तविण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे शेतकरी या पारंपारिक भाकणुकीतून वर्षभरातील पावसाचा व पीकस्थितीचा अंदाज घेतात. यानुसार येथे सकाळी साडेआठ वाजता हा विधी पार पडला.या परंपरेनुसार गावचे मुलकी पाटील गिरीश पवार व नारायण पवार यांनी पूजन करून ही भाकणूक सांगितली. या वेळी सागर भुजबळ, उमेश भुजबळ, भूषण भुजबळ, नितीन जाधव, आप्पा भुजबळ आदी उपस्थित होते.
यावेळी पुरोहित सचिन आगलावे व सचिन देशपांडे यांनी या विधीचे पौराहित्य व पंचांग वाचन केले. भाकणुकीनुसार आषाढ महिन्यात चांगला पाऊस पडून धनधान्य होऊन प्रजा सुखी राहील. श्रावण, भाद्रपद आणि आश्विन महिन्यांत मुसळधार पाऊस पडेल तर कार्तिक, मार्गशीर्ष व पौष महिन्यांतही समाधानकारक पाऊस राहील.
माघ व फाल्गुन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. या वेळी वाल्हेसह आडाचीवाडी, सुकलवाडी व वागदरवाडीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.












