पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखाव्यासाठीच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात एका नागरिकाने थेट आयुक्त मा. नवलकिशोर राम यांना लेखी तक्रार देत कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, नदीपात्रात करण्यात आलेली कारवाई तसेच कर्वेनगर आणि ताथवडे उद्यान परिसरातील फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील पत्र्याच्या शेडवर मनपाने अलीकडेच कारवाई केली. या कारवाईची प्रसिद्धीही वृत्तपत्रांमधून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेला मुख्य सवाल म्हणजे, कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य संबंधितांना इतक्या लवकर परत कसे मिळते? यासाठी मनपाचे नेमके धोरण काय आहे, तसेच कायद्यानुसार पुढील कारवाई का होत नाही, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे.यासोबतच, फ्रंट आणि साईड मार्जिनमधील शेड हटवण्यात आली असली तरी त्या जागेत व्यवसाय मात्र पूर्ववत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्यवसाय सुरू ठेवणे कायदेशीर आहे का, याबाबतही प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे.
“अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी शेड उभारली जाते आणि व्यवसाय सुरू होतो. ही कारवाई म्हणजे केवळ तात्पुरती धुळफेक असून, शहराच्या नियोजनाला यामुळे मोठा फटका बसत आहे,” असा आरोप तक्रारदाराने केला आहे.शहराचा विकास आणि सुयोग्य नियोजन साध्य करायचे असेल, तर अतिक्रमणाविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
अन्यथा, “कारवाई” ही फक्त कागदोपत्री राहून प्रत्यक्षात परिस्थिती बदलणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, याबाबत पुणे महानगरपालिकेकडून नेमके धोरण आणि पुढील कारवाई काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












