पिंपरी -चिंचवड महापालिका हद्दीतील पीएमपी बस थांब्यावर उभारण्यात आलेल्या होर्डिंगच्या परवान्याची मुदत जूलै २०२५ रोजी संपली आहे. मागील आठ महिन्यापासून संबंधित ठेकेदार एजन्सीकडून महापालिका हद्दीतील बस थांब्याच्या अनधिकृतपणे होर्डिगवर जाहिराती लावून उत्पन्न मिळवत आहे.
दोन महिन्यानंतर वादळीवारे सुरु होऊन अवकाळी पाऊस सुरु होईल. त्यामुळे या अनधिकृत फलकामुळे आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पीएमपीएल प्रशासनाकडे पत्र पाठवून संबंधित कंपनी ठेकेदाराच्या अनधिकृत होर्डिंग हटवण्यात यावेत, असे पत्राद्वारे कळविले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत ११० बस थांब्यावर होर्डिग उभारणीची परवानगी देण्यात आली होती. यापैकी मे. पायोनियर पब्लिसिटी प्रा. लि. या जाहिरात कंपनीचे सांगवी फाटा ते किवळे या मार्गावरील २१ फलक आणि नाशिक फाटा ते वाकड मार्गावर १२ फलक उभारले आहेत. या दोन्ही मार्गावरील ३३ होर्डिगची परवान्याची मुदत संपली आहे. सदर मुदत जाहिरातीची मुदत १५ जूलै २०२५ रोजी संपुष्टात आली आहे. बीआरटी बस शेल्टर्सवरील मुदत संपुष्टात आल्याने बस थांब्यावर जाहिराती प्रदर्शन पीएमपी प्रशासनाने रद्द करण्यात आले आहे.
याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून पीएमपी प्रशासनास पत्र दिले आहे. महापालिका हद्दीतील बीआरटी मार्गात बस थांब्यावर हे होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. मात्र, या होर्डिंगच्या जाहिरात परवान्याची मुदत संपली आहे. तरीही पायोनिअर जाहिरात एजन्सीकडून होर्डिंगवर अनधिकृत जाहिराती प्रसिध्द केल्या जात आहेत. या होर्डिंगमुळे काही दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत सदर जाहिरात एजन्सीकडून फलकावर जाहिरात प्रसिध्द होत असून, आपणाकडून संबंधित कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे हे सर्व होर्डिंग काढण्यात येतील. संबंधित जाहिरात एजन्सीने लावलेले होर्डिंग अनधिकृत असल्याने ते निष्कासित करुन विल्हेवाट लावले जातील, असेही पत्राद्वारे कळविले आहे.
–या मार्गावर होर्डिंगसाठी परवानगी
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावेत, म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बीआरटी मार्गावरील पीएमपी बस थांब्यावर जाहिरात होर्डिंग उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, पीएमपीएमएल प्रशासनाने निविदा प्रक्रिया करुन संबंधित पायोनिअर पब्लिसिटी कार्पोरेशन प्रा. लि. जाहिरात एजन्सीला हे काम दिले होते. त्या कंपनीकडून महापालिका हद्दीतील निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिखली आणि दिघी ते आळंदी फाटा या मार्गांवर होर्डिंग उभारले आहेत.
होर्डिंग धोकादायक
बीआरटी मार्गातील पीएमपीएल बस थांब्यावर होर्डिंग धोकादायक स्थितीत आहे. अनेक बस थांब्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे धोकादायक होर्डिंग पाहून प्रवाशांना सावधान राहण्याची वेळ आली आहे. पीएमपीएल प्रशासनाने निविदा काढून उभारलेल्या होर्डिंगमुळे बस थांबे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. बस थांब्यानजीक असणारे होर्डिंग महापालिकेने तपासणी करून तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
घरातून बाहेर दररोज नोकरी निमित्त बाहेर पडतो. तेव्हा पीएमपी बसने प्रवास करावा लागतो. धोकादायक होर्डिंग हवेच्या हेलकाव्याने कधी कोसळू शकतात. त्यात बीआरटी मार्गातील बस थांब्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. त्यात पीएमपीने बस थांब्यावर होर्डिंग उभारल्याने बस थांब्यातून बाहेर पडताना जीव मुठीत धरुन पडावे लागत आहे. बस थांब्याजवळ असणारे होर्डिंग हे महापालिका व पीएमपी प्रशासनाने तपासणी करुन धोकादायक असतील तर काढून प्रवाशांना सुखरूप करावे.












