गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच उन्हाळी आवर्तनामुळे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला असून सध्या १०४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाचे सूत्रांनी व्यक्त केले.
पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुबलक पावसामुळे २६ धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. या धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता १९८.३४ टीएमसी असून, पावसाळ्यानंतर तब्बल २०२.६७ टीएमसी (१०२ टक्के) पाणीसाठा नोंदवला गेला होता. मात्र, मागील तीन महिन्यांत झालेल्या वापरामुळे सध्या धरणांमध्ये सुमारे ५२ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ८०.६९ टीएमसी, म्हणजेच ४० टक्के इतका होता. त्यामुळे यंदा तुलनेने अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते.
रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, मका, सूर्यफूल तसेच कांदा, बटाटा, भाजीपाला व फळबागा ही पिके सध्या वाढीच्या आणि काढणीच्या अवस्थेत आहेत. उन्हाळी पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहावे, यासाठी चालू महिन्यांपासून धरणांतून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे.
शहरांचा वाढता पाणीपुरवठा
जिल्ह्यातील बहुतांश धरणे पश्चिम भागात असून उजनी धरण वगळता इतर सर्व धरणे पश्चिमेकडे आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना प्रामुख्याने खडकवासला धरण, चासकमान धरण आणि पवना धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. तसेच पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांसाठी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.
सध्या खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड आणि उजनी धरण या नऊ धरणांतून डाव्या व उजव्या कालव्यांसह बंद जलवाहिनीद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी हळूहळू घटत आहे.
धरणनिहाय असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये
टेमघर ०.६८, वससगाव ६.७१, पानशेत ६.५८, खडकवासला ०.८६, पवना ४.२९, कासारसाई ०.२९, कळमोडी १.४२, चासकमान ३.५८, भामा आसखेड ५.००, आंद्रा १.६८, वडिवळे ०.७२, शेटफळ ०.४१, नाझरे ०.२८, गुंजवणी २.०१, भाटघर १४.२२, निरा देवघर ६.६०, वीर ४.७३, पिंपळगाव जोगे १.७७, माणिकडोह ३.०७, येडगाव ०.९७, वडज ०.७१, डिंभे ५.९३, चिल्हेवाडी ०.६४, घोड १.७१, विसापूर ०.४७, उजनी २८.६६, मुळशी ९.९९












