मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी आणखी कोणी सामील आहे, हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास, ते देखील घोटाळ्यास जवाबदार असतील, असा निष्कर्ष महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समितीने काढला आहे.
अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी संदर्भात पुढील पानावर सरळ पार्थ पवार यांचे नावही नमूद केलेले आहे. या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. आता जर कोणी पार्थ पवार यांना वाचवत असेल तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवत असल्याचे सिद्ध होईल, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (दि. २६) माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी दमानिया म्हणाल्या की, या प्रकरणी चौकशी समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, “संबंधित प्रकरणामध्ये शासकीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करण्याची खरेदी दस्त नोंदवण्यात आली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. या अनियमिततेसाठी विक्री करणारे आणि खरेदी करणारे म्हणजे अमेडिया कंपनी, म्हणजेच पार्थ पवार तसेच यामध्ये मी स्पष्टपणे सांगते की दिग्विजय पाटील यांचा सहभाग आहे.”
अशा बेकायदेशीर, नियमबाह्य खरेदी दस्तांची नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी हे निश्चितपणे जबाबदार आहेत. म्हणजेच, जमीन देणाऱ्या शीतल आहेत, तर घेणारी अमेडिया आहे. या बेकायदेशीर व्यवहारात सर्व विभागातील लोक निश्चितपणे जबाबदार आहेत, असे समितीचे स्पष्ट मत असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.
शीतल तेजवाणी, पॅरामाऊंट, जमीन खरेदी करणारे अमेडिया यांच्या तर्फे दिग्विजय अमरसिंग पाटील तसेच रवींद्र तारू, सूर्यकांत देवळे इत्यादींची माहिती दिली आहे. यामध्ये समितीतर्फे चौकशी सुरू असताना जबाबदार असणाऱ्या आणखी काही व्यक्तींचा समावेश दखल गुन्ह्यांमध्ये करण्यात यावा, अशा प्रकारचे निवेदन समितीला मी दिले होते. या व्यवहारात प्रत्येक ठिकाणी एकच नाव येत होते दिग्विजय पाटील. त्यामुळे यामध्ये पार्थ पवार यांचे नाव आणणे, त्यांचा समावेश करणे गरजेचे आहे, अशी मांडणी मी समितीसमोर केली होती. त्याचीही दखल समितीने घेतली असल्याचे दमानिया यांनी यावेळी सांगितले.












