पुणे, दि. 26 मार्च 2026 – रामनवमी निमित्त शहरात सुरू असलेल्या बंदोबस्तादरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून सुमारे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मार्केटयार्ड व बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, दिनांक २६ मार्च रोजी बंदोबस्तादरम्यान गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला माहिती मिळाली की, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार बैल बाजार, मार्केटयार्ड परिसरातून जाणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४८, रा. बहात्तर वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, मांजरी बुगा, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले.आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. १९/२०२६ तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०४/२०२६ असे दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यांअंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(ए) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४५ ग्रॅम वजनाचा, ५,४०,००० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या पथकाने केली.
या पथकात पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, संतोष टकले, विनोद चव्हाण, ओंकार कुंभार, योगेश मांढरे, शंकर कुंभार, विजय कुमार पवार, विशाल दळवी, शंकर नेवसे व ऋषिकेश व्यवहारे यांचा समावेश होता.या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.












