वसई विरार मध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाताणे वनपरिक्षेत्राच्या पथकाने कारवाई करीत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन जणांना सापळा रचून अटक केली आहे.त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.
भाताणे वनपरिक्षेत्राचे अधिकारी विजय बारब्दे यांना गुप्त बातमीदाराकडून बिबट्याच्या कातडीच्या विक्रीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वन विभागाने तस्करांना पकडण्यासाठी योजना आखली होती.
वनाधिकारी बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून तस्करांशी संपर्क साधला. कातडी खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्यांनी तस्करांना विरार जवळील खानिवडे टोल नाक्याजवळील एका निर्जन स्थळी बोलावले.
तस्कर कातडी घेऊन येताच, दबा धरून बसलेल्या वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. आपल्या जीवाची पर्वा न करता वनाधिकाऱ्यांनी या दोघांनाही रंगेहात पकडले.त्यांच्याकडून बिबट्याची पूर्ण कातडी जप्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बारब्दे, नितीन खुळपे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १ एप्रिल पर्यँत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.












