भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडले. या अपघातामध्ये ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. महिलांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील कडवंची शिवारात ही अपघाताची घटना घडली. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या चाकाखाली चिरडून ६ महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर सगळीकडे रक्ताचा सडा पडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.












