सध्या समाजात वाढत्या तणावाच्या चर्चांदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावमध्ये मात्र बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.महावीर जयंतीच्या निमित्ताने मराठा समाजातील विष्णू शामराव पाटील यांनी दिगंबर जैन समाजाला सुमारे साडेदहा गुंठे अगदी मोक्याची जमीन बक्षीसपत्राद्वारे देत समाजातील ऐक्याची परंपरा अधिक दृढ केली आहे.
सध्या या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात असून या निर्णयाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.पेठवडगाव येथील गणेश मंदिराच्या पाठीमागे विष्णू पाटील यांच्या मालकीची जागा आहे. याच ठिकाणी दिगंबर जैन समाजाचे ‘निषिधी’ मंदिर आहे.
या मंदिराबद्दल पाटील कुटुंबाच्या मनात विशेष श्रद्धा असून अनेक वर्षांपासून जैन समाजाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी अनंत पौर्णिमेला जैन समाजाची पालखी या ठिकाणी येते आणि मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. या परंपरेतून दोन्ही समाजांमधील स्नेह अधिक दृढ झाला आहे.
अलिकडच्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग आणि विकासकामे झाल्यामुळे जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. तरीही आर्थिक फायद्याचा विचार न करता धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपण्याच्या भावनेतून विष्णू पाटील यांनी ही साडेदहा गुंठे जागा दिगंबर जैन समाजाला बक्षीसपत्राने देण्याचा निर्णय घेतला.
मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला इतक्या मोठ्या किमतीची जमीन देणे ही परिसरात आदर्शवत घटना मानली जात आहे.या उपक्रमासाठी कृष्णात पाटील आणि ॲड. उदय महाजन यांनी पुढाकार घेतला.
जैन समाजाचे अध्यक्ष सत्यंधर भोरे यांच्यासह अमोल हुक्केरी, नंदू ढवळे, शिरीष पाटील, राजकुमार पाटील, शैलेश सूर्यवंशी, संतोष आडुरे आणि संजय आडुरे यांच्या ताब्यात ही जागा देण्यात आली.
महावीर जयंतीसारख्या पवित्र दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ जैन समाजालाच नव्हे, तर संपूर्ण पेठवडगाव आणि जिल्ह्याला सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचा संदेश मिळाला आहे. विष्णू पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या या उदार कृतीचे परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेकांनी याला समाजासाठी प्रेरणादायी पाऊल असे म्हटले आहे.












