नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावावर शोककळा पसरवणाऱ्या भीषण अपघातात मृतांची नावे समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.शुक्रवारी रात्री दिंडोरी शहरात खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.शुक्रवारी रात्री दिंडोरी शहरात एका खाजगी शिकवणी वर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला होता. कार्यक्रम संपल्यानंतर इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातील सदस्यांसह काही विद्यार्थी कारने (क्र. MH15-JS-1053) आपल्या गावाकडे परतत होते.
रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर परिसरातील राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार अचानक कोसळली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आणि रात्री अंधार असल्यामुळे कार शोधणे कठीण ठरत होते. अखेर तीन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री सुमारे बारा वाजता कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले.कार बाहेर काढल्यानंतर आत असलेल्या सर्व ९ जणांचा गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या दुर्घटनेत सात विद्यार्थी आणि दोन पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे इंदोरे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या चिमुकल्यांवर आणि त्यांच्या पालकांवर काळाने झडप घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
१) रेश्मा सुनील दरगुडे (वय २७)
२) आशा अनिल दरगुडे (वय ३२)
३) खुशी अनिल दरगुडे (वय १४)
४) श्रेयस अनिल दरगुडे (वय ११)
५) राखी सुनील दरगुडे (वय ११)
६) श्रावणी अनिल दरगुडे (वय ११)
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे (वय ७)
८) माधुरी अनिल दरगुडे (वय १३)
९) सुनील दत्तू दरगुडे (वय ३२)
या दुर्घटनेमुळे इंदोरे गावात शोककळा पसरली असून संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे.












