भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खरात प्रकरणात मोठी मागणी केली असून, अंजली दमानिया यांच्यावर देखील टीका केली आहे.
सध्या राज्यात अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं दिसत आहे. या संपूर्ण वादाला वेगळं वळण मिळालं ते अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानंतर. दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात तब्बल १७ फोन कॉल्स झाल्याचा आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली. मात्र, या दाव्यानंतर आता उलट प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दमानिया यांच्याकडे खरात यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आला तरी कसा? हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचला कसा? यावरूनच नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली आहे.
सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर एसआयटीकडून तपासाला अपेक्षित वेग मिळत नसेल, तर ही चौकशी तात्काळ सीआयडीकडे सोपवली जावी. त्यांच्या मते, या प्रकरणात अनेक गंभीर बाबी आहेत ज्यांची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. अंधारे यांनी यावेळी आणखी काही धक्कादायक मुद्दे उपस्थित केले.
राज्यातील काही नेत्यांच्या, अगदी मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरही आक्षेपार्ह प्रकारे फुल्या मारल्याच्या घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे कृत्य नेमकं कोण करत आहे? या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे? आणि अशोक खरात यांच्या माध्यमातून कोणत्या लोकांना प्रोत्साहन दिलं जात आहे? या सर्व बाबींचा तपास झाला पाहिजे, असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
तसेच त्यांनी आर्थिक बाजूवरही बोट ठेवलं. “या प्रकरणातील आर्थिक स्त्रोत का तपासले जात नाहीत?” असा थेट सवाल करत त्यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
त्यांच्या मते, जर बाहेरील व्यक्ती सीडीआर मिळवू शकते, तर अधिकृत यंत्रणांना ते मिळवण्यात अडचण का येते? तपासात ही ढिलाई का दिसते आहे? हे समजणं आवश्यक आहे. याशिवाय, दीपक केसरकर यांच्यासह इतर संबंधित व्यक्तींनी खरंच फोन कॉल्स केले होते का, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये, प्रत्येक घटकाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शेवटी, त्यांनी इशारा देत सांगितलं की, हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर समाजातील महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे.
जर लवकरात लवकर या प्रकरणात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यामुळे सरकार आणि तपास यंत्रणांनी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करून सत्य बाहेर आणावं, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.












