मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गर्दीचा फायदा घेत एका २० वर्षीय तरुणीने महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र चोरल्याची ही घटना घडलीये.
मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिला आरोपीला स्टेशनवरच पकडण्यात यश आलंय.सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रेल्वे स्टेशन परिसरातील नेहमीची गर्दी दिसतेय. अशावेळी अचानक एक महिला आरडाओरडा करताना दिसते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचं लक्षात येताच तिला संशय आला. यावेळी काही प्रवाशांनी आणि स्थानिकांनी संशयित तरुणीचा पाठलाग करून तिला पकडलं आणि तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने गर्दीचा फायदा घेत ही चोरी केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे, ही घटना भरदिवसा घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याचीही चर्चा सुरू झालीये.
आरोपी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्याकडून अधिक चौकशी केली जातेय. या प्रकरणात ती एकटी होती की एखाद्या टोळीचा भाग आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने घालताना खबरदारी घेणं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.












