जुन्या वादाचा राग मनात धरून काही युवकांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरातील संतोषनगर येथील शनि मंदिराजवळ असलेल्या दिग्विजय चौकात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २९ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. अंजनीनगर, गणपती मंदिराजवळ, कात्रज) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी अजमल यांचे वडील अब्दुल रहिम नदाफ (वय ४५, रा. बिलाल आशियाना, अंजनीनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काही युवकांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जखमी अजमल यांचे वडील अब्दुल रहिम नदाफ (वय ४५, रा. बिलाल आशियाना, अंजनीनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काही युवकांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ हा ए.सी. दुरुस्तीचे काम करतो. यापूर्वी त्याचे आर्यन, यश, शुभम व इतर काही युवकांबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अजमल याला शनि मंदिराजवळील दिग्विजय चौकात अडवले.
यानंतर आरोपींनी त्याच्यावर लोखंडी हत्याराने (कोयत्याने) डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, अजमल याचा जीव घेण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अजमल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
आंबेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी पुढील तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.












