निगडी येथील यमुनानगर परिसरात एका हॉटेल चालक महिलेला मी गुन्हेगार आहे अशी धमकी देऊन एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना शनिवारी (४ एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणात २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल प्रल्हाद देवकर (३२, बोदवड, जि. जळगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल देवकर हा फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आला. त्याने ‘मी गुन्हेगार आहे’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. हॉटेल व्यवस्थित चालवायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली.
पैसे न दिल्यास हॉटेल तोडून टाकण्याची आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ७५ लाखांची फसवणूकताथवडे परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली.
ही घटना ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.या प्रकरणात एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांकधारकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका नामांकित सिक्युरिटीज कंपनीचे सल्लागार असल्याचे भासवले. त्यांची कंपनी सेबी रजिस्टर आहे असे सांगून फिर्यादीला शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले. तिथे विविध आयपीओ आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले.
सेबी आणि नामांकित कंपन्यांचे बनावट शिक्के असलेले लेटर दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने ७५ लाख ५० हजार रुपये भरल्यानंतर आरोपींनी ती रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.












