प्रभादेवी येथील एका व्यावसायिकाच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीची चोरी उघड झाली आहे. व्यावसायिकाच्या घरातील रक्कम काही दिवसांपासून गायब होत होती. याचा व्यावसायिकाने छडा लावण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी त्याने घरात सीसीटीव्ही बसवले. पण, सीसीटीव्हीत पाहिलेल्या घटनेनंतर त्यांना हादराच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक होरायझन टॉवरमध्ये ६२ वर्षीय व्यावसायिक राजेंद्र देवकीनंदन धानुका आपल्या पत्नी ज्योती धानुका यांच्यासोबत राहतात. क्रॉफर्ड मार्केट येथे धानुका यांचा व्यवसाय आहे. पती-पत्नी दोघेही सकाळी कामावरून निघून जातात. घर मोठे असल्याने त्यांनी सुचिता पाटील नावाच्या महिलेला अडीच वर्षांपूर्वी कामासाठी ठेवले होते. सुचिता पाटील ही सकाळी ९ ते १०.३० दरम्यान काम करायची.
अलीकडेच धानुका यांनी आर्थिक वर्षाच्या कामासाठी सुमारे ६ लाख रूपये आणून बेडरूमधील कपाटात ठेवले होते. त्याशिवाय मुलीच्या लग्नानंतर उरलेले ३ ते ५ लाखांची रक्कम कपाटात ठेवले होते. मागील आठवड्यात जेव्हा धानुका यांनी रोख रक्कम मोजली त्यात २ लाख रूपये कमी आढळून आले होते.
सुरूवातीला कुणावर संशय गेला नाही. मात्र, सतत पैसे कमी होत असल्याने धानुका दाम्पत्याला शंका आली. त्यामुळे त्यांनी ४ एप्रिलला बेडरूमध्ये गुप्तपणे सीसीटीव्ही कॅमेरा लावला, ज्याची माहिती मोलकरीण सुचिता पाटीलला नव्हती. ६ एप्रिलला धानुका दाम्पत्य कामासाठी निघून गेले.त्यानंतर धानुका यांनी मोबाईवर सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज पाहिले, त्यात १०.२० च्या दरम्यान सुचिता पाटील ही बेडरूमध्ये शिरली. तिने सगळे पडदे बंद केले.
चावी शोधून कपाट उघडले आणि त्यातील ५०० रूपयांच्या नोटांच्या बंडलमधून पैसे काढत आपल्या अंतरवस्त्रात लपवले.हे पाहून धानुका दाम्पत्याला एकच धक्का बसला. त्यांनी तातडीने ५ एप्रिलचे फुटेजही तपासले. त्यात १०.५८ मिनिटाला सुचिता पाटील अशाच पद्धतीने पडदे बंद करून कपाटातून रक्कम चोरताना दिसली.
खात्री करण्यासाठी धानुका दाम्पत्य तातडीने घरी पोहोचले आणि दोन्ही कपाटातील रोख रक्कम पुन्हा मोजली. त्यानुसार ५ आणि ६ एप्रिलला मोलकरणीने एकूण २.७० लाख रूपये रक्कम चोरल्याचं स्पष्ट झाले. तसेच, गेल्या आठवड्यात गायब झालेले २ लाख मिळून एकूण ४.७० लाख रूपयांची चोरी झाली होती.
यानंतर धानुका दाम्पत्याने आपली मुलगी आणि जावयाला बोलावून घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर दादर पोलीस ठाण्यात मोलकरीण सुचिता पाटील हीच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
तक्रारीत सांगितलं, ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या वेळी बेडरूमच्या कपाटातून ५०० रूपयांच्या एकूण ९४० नोटा म्हणजे ४.७० लाख रूपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की, सुचिता पाटील ही पहिल्यांदा पडदे बंद करायची. जेणेकरून कुणाला संशय येणार नाही आणि नंतर कपाटातून पैसे चोरायची.












