वाई : डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित द्रविड हायस्कूल, वाई येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ११ एप्रिल जयंतीचे तसेच विश्वरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीचे औचित्य साधत शालेय प्रांगणात भव्य फलकचित्रण व फलकलेखन उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत शाळेचे पर्यवेक्षक व सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठित ज्येष्ठ कलाशिक्षक घनश्याम महादेव नवले यांनी आपल्या अद्भुत चित्रकारितेतून अत्यंत आकर्षक, देखणे व भावस्पर्शी चित्र साकारले.
हे चित्र साकारताना शाळेतील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. नवले सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रंगकाम, रेखाटन व फलकलेखनात हातभार लावत या उपक्रमात सक्रिय भूमिका बजावली. या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांसोबतच सामाजिक जाणीवेचीही जोपासना झाली.
या चित्रामध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी करण्यात आली असून, पाहणाऱ्यांना समाजपरिवर्तनाचा संदेश देणारी ही कलाकृती ठरत आहे.
नवले सर हे आपल्या उत्कृष्ट कलाकौशल्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये ओळखले जातात. त्यांच्या कलाकृतींमध्ये सामाजिक आशय, विचारांची खोली आणि सर्जनशीलतेचा उत्तम संगम दिसून येतो. त्यांच्या या चित्रामुळे शाळेच्या प्रांगणाला विशेष शोभा प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सामाजिक जाणीवेबाबत प्रेरणा निर्माण झाली आहे.
शाळेमध्ये पट पडताळणीसाठी आलेल्या पंचायत समिती, वाई शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चित्राचे विशेष कौतुक करत नवले सरांच्या कलात्मकतेचे तोंडभरून अभिनंदन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय भोसले सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही नवले सरांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
शालेय समितीचे अध्यक्ष श्री.नितीन पोरे तसेच संस्थेचे विश्वस्त अनंत जोशी , अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापुरे यांनी, “नवले सरांनी साकारलेली ही कलाकृती म्हणजे महापुरुषांना वाहिलेली एक आगळी-वेगळी आदरांजली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि प्रेरणा निर्माण होते,” असे मत व्यक्त केले.
द्रविड परिवारातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महान विभूतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
द्रविड हायस्कूल, वाई ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे एक संस्कारक्षम केंद्र आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक भान विकसित करण्याचे कार्य येथे सातत्याने केले जाते. येथील शिक्षकवर्ग अत्यंत समर्पित वृत्तीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक विद्यार्थ्यामधील गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम करतो. नाविन्यपूर्ण उपक्रम, शिस्तबद्ध वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांमुळे द्रविड हायस्कूलने वाई शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शाळेतून घडलेले अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत असून, संस्थेच्या उज्ज्वल परंपरेला अधिक बळकटी देत आहेत.











